आज तीन ठिकाणी मॉकड्रिल   

ब्लॅक आउट नाही, जिल्हाधिकार्‍यांंची माहिती

पुणे :  जिल्हयात तीन ठिकाणी आज (बुधवारी) नागरी संरक्षण सराव (मॉकड्रिल) केले जाणार आहे. पुणे शहरात विधान भवन, पौड येथील मुळशी पंचायत समितीचे कार्यालय आणि तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद येथे दुपारी चार वाजता संरक्षण आणि पोलिस विभागासह इतर विभागांतील प्रत्येकी १० ते १५ अधिकारी व कर्मचारी आणि १०० ते १५० महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. 
 
केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रिल करण्याचे आदेश सर्व राज्यांना  दिलेले आहेत. त्याअनुषंगाने पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. 
ते म्हणाले, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मदत आणि मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी खबरदारी म्हणून ही मॉकड्रिल आयोजित केली आहे. एखाद्या इमारतीमध्ये आग लागली तर कशा पद्धतीने कार्यवाही करायची हे तपासले जाणार आहे. बाँब हल्ला झाल्यास जखमींना कमीत कमी वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार कसे देता येतील हे पाहिले जाणार आहे. 
 
जिल्हा प्रशासन, पोलिस, लष्कर, हवाई दल, अग्निशमन दल , एनडीआरएफ पुणे आणि पिंपरी महापालिका, आरोग्य विभागाचे १० ते १५ अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त सामान्य नागरिक म्हणून विविध महाविद्यालयांचे १०० ते १५० विद्यार्थी उपस्थित राहतील. हेच विद्यार्थी मास्टर ट्रेनर म्हणून काम करतील. केंद्र सरकारच्या पुढील सुचना आल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात काम करण्यात येईल, असे डुडी म्हणाले.
 
पुण्यात ब्लॅक आउट नाही
 
सरकारच्या निर्देशाप्रमाणे पहिला मॉकड्रिल घेतला जात आहे. तसेच वॉर रूम सुद्धा तयार करण्यात येणार आहे. त्यात सर्व विभागांचा समन्वय असणार आहे. पुणे नाही तर मुंबईत एका ठिकाणी ब्लॅक आउट असणार आहे. देशभरात २४४ जिल्ह्यांत  एकाच वेळी ही मॉकड्रिल होणार आहे.  सायरन वाजल्यानंतर काय काय करायचे याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या व्यवहारावर तसा कोणताच परिणाम होणार नाही.
 
सायरन एकाच ठिकाणी वाजणार
 
• शहरात ७५ ठिकाणी सायरन बसवण्यात आले आहे. ते सुरु असल्याची खात्री करण्यात आली आहे. शहरात केवळ एकाच ठिकाणी सायरन वाजणार आहे. सायरन वाजल्यानंतर सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता आप आपले व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे. 

Related Articles